मराठा आरक्षण मिळाले नाही तर मराठ्यांचा तांडव रोखूनच दाखवा
साष्टपिंपळगाव मराठा आंदोलकांचा इशारा
साष्टपिंपळगाव : गेल्या ३९ वर्षांपासून या ना त्या कारणाने सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना झुलवत ठेवले आहे. नुसती बनवाबनवी आणि फसवाफसवी सुरू आहे. आमच्याबद्दल जीवघेणा तिरस्कार सरकारच्या मनात आहे. म्हणूनच शासन दररोज फसवे आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे. मात्र तुमची गाठ कडवट सच्च्या साष्टपिंपळगाव मराठा आंदोलकांशी आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील नाहीतर पुढील काळात मराठ्यांचा तांडव रोखूनच दाखवा असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मराठा समाजाच्या तसेच साष्टपिंपळगाव आंदोलकांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात नसता पुढील काळात पुन्हा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. अजूनही वेळ हातातून गेलेली नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या विषयास गंभीरतेने घ्यावे असा इशाराच सकल ग्रामस्थांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकर्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. परंतु २०-२२ दिवस उलटूनही आंदोलकांना मागणीबाबत साधा फोनही करण्यात आलेला नाही. त्यामुळे साष्टपिंपळगाव येथील मराठा समाजाने स्थगित केलेले आमरण उपोषण १० एप्रिलपासून सुरू केले होते. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता पुन्हा एकदा आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
आमची भावना शासन-प्रशासन यांना सहकार्य करण्याची आहे पण सरकार जर आमच्या समाज हिताच्या भावना, समाज उपयोगी मागण्या सोडवतच नसेल तर नाईलाजास्तव आम्हालाही सरकार विरोधात बंड करून आंदोलन पुकारावेच लागेल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तसेच येत्या काळात एक व्यापक निर्णायक बैठक घेऊन राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन सकल मराठा समाज एकजुटीने उभारणार असल्याचे साष्टपिंपळगाव मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.